Kidney Stones: Myths and Facts - Dr. Parag Gulhane
कोरोना ची साथ जगभर पसरली असून भारतात देखील त्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांचा सहयोग आवश्यक आहे. पण कोरोनाच्या भीतीपोटी इतर आजारांकडे दुर्लक्ष करणे अयोग्य ठरेल. आपली तब्येत आपल्याच हातात असते. योग्य वेळी काळजी घेतल्यास प्रत्येक आजारावर मात करणं शक्य आहे. म्हणून मी आज किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा या विषयावर उपयुक्त काही माहिती आपल्याला सांगू इच्छितो.
स्टोन म्हणजेच खडा, शरीराच्या विविध अवयवांमध्ये तयार होतो. त्यातील मूत्रमार्ग आणि पित्ताशय हे महत्त्वाचे. मुतखडा आणि पित्ताशया मधील खडा हे दोन्ही वेगवेगळे आजार. त्यांच्या उपचार पद्धती व उपचार करणारे डॉक्टर देखील वेगवेगळे, सोप्या भाषेत सांगायचं तर यूरोलॉजिस्ट म्हणजे मुत्रमार्गातील खड्यांचे विशेषज्ञ.
भारतात १५ टक्के लोकांना मुतखड्याचा आजार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये याचे बरेच रुग्ण आढळून येतात. सर्व वयोगटातील हा आजार आहे. पुरुष आणि स्त्री यामध्ये हा भेदभाव करत नाही. खडा मूत्रपिंड म्हणजेच किडनी, मूत्रनलिका म्हणजेच युरेटर आणि लघवीची पिशवी म्हणजेच युरिनरी ब्लेडर यांमध्ये सापडतो. बहुतांश लोकांमध्ये कॅल्शियम ओक्झालेट, कॅल्शियम फॉस्फेट आणि युरिक ऍसिडचे खडे दिसून येतात. त्यांचा आकार वेगवेगळा व त्यांच माप ३ मिलिमीटर पासून ६ सेंटीमीटर पेक्षा जास्त असू शकतं.
मुतखड्याचा त्रास हा उष्ण आणि कोरड्या वातावरणात जास्त होतो. म्हणून उन्हाळा हा आंब्याचाच नव्हे तर खड्याचा पण ऋतू आहे. घाम जास्त गळतो, शरीरातील पाणी कमी होतं, लघवीतील क्षार वाढतात आणि खड्यांची निर्मिती होते.
मुतखड्याची लक्षणे कोणती?
पोटाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला तीव्र वेदना होणे. मागे पाठीतून पुढे पोटाच्या खालच्या बाजूला हे दुखणं असतं. याशिवाय मळमळ, उलटी, लघवीला आग अथवा अपूर्ण लघवी होते. इन्फेक्शन झाल्यास ताप देखील येऊ शकतो. पण प्रत्येक मुतखडा पोट दुःखवेलच असे नाही. खडा जर मूत्रपिंडातून बाहेर निघणाऱ्या लघवीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करत असेल तरच तो वेदनादायी ठरतो. मूत्रपिंडाच्या कोपऱ्यात असलेला लहान खडा बहुतांशवेळा काही त्रास देत नाही. पण वेळेनुसार लहान खडा मोठा होऊन त्रासदायक ठरू शकतो.
लक्षणे आढळल्यास उपाय ?
त्वरित आपल्याजवळील यूरोलॉजिस्ट म्हणजेच मूत्ररोग विशेषज्ञाला संपर्क साधावा. कोरोनाच्या काळात ते लगेच शक्य न झाल्यास किमान फोनवर त्यांना विचारून एखादी पेनकिलर घ्यावी. जवळपासच्या सोनोग्राफी सेंटरला भेट देऊन पोटाची सोनोग्राफी करून, रिपोर्ट त्वरित डॉक्टरांना कळवावा. गरज भासल्यास एक्सरे किंवा सिटी स्कॅन देखील करावा लागू शकतो.
उपचार पद्धती.
प्रत्येक मुतखड्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक नसते. काही खडे औषधांनी देखील घालवता येतात अथवा काहींना त्याची पण गरज भासत नाही, फक्त काही पथ्य पाळावी लागतात. साधारण ८ मिलिमीटर पेक्षा लहान खड्यांसाठी औषधी प्रभावी ठरतात, मग ते आयुर्वेदिक किंवा ऍलोपॅथिक कुठलेही. बरेचदा लोकांमध्ये गैरसमज असतो की औषध खाल्ल्यामुळे खड्याच्या मापा मध्ये घट होईल. पण तसं नसतं. खड्याचे माप कुठल्याही औषध पद्धतीने कमी होऊ शकत नाही. सोनोग्राफी वर त्याची कुठली बाजू मोजण्यात आली यावर ते अवलंबून असतं आणि म्हणून प्रत्येक सोनोग्राफीमध्ये त्याचं माप वेगवेगळे येऊ शकत. औषधी फक्त खड्याचा मार्ग मोकळा करून त्याला बाहेर पडायला मदत करतात, त्याचं आकारमान कमी करत नाहीत. ८ मिलिमीटर पेक्षा मोठ्या खड्यांमध्ये औषधींचा फार काही उपयोग होत नाही. रुग्ण महिनोन्महिने मोठ्या खड्यांसाठी औषधी घेतात, पण खडा बाहेर पडत नाही, उलट किडणीवर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. जेवढे जास्त दिवस खडा अडकून राहतो तेवढी किडनीची कार्यक्षमता कमी होत जाते. आणि हे रुग्णांना काही वर्षांनी जाणवतं. पूर्वीच्या काळी खड्यांची शस्त्रक्रिया म्हणजे किचकट, टाक्यांची पण काळ बदलला आहे. आता जवळपास सर्व खडे बिन टाक्याची किंवा एका टाक्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काढले जाऊ शकतात. डिस्चार्ज देखील लवकर होतो आणि दुष्परिणाम सुद्धा फार कमी. म्हणून खडा शरीरात ठेवून किडनी खराब केल्यापेक्षा तो शस्त्रक्रियेने काढणे कधीही योग्य.
मुतखड्या पासून स्वतःला कसे वाचवाल?
सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी पिण्याचे प्रमाण कमी होता कामा नये. एका व्यक्तीने दिवसाला किमान ३ ते ३१/२ लिटर पाणी प्यायला हवे, जेणेकरून दिवसभराच्या लघवीचे प्रमाण दोन लिटर पेक्षा अधिक असले पाहिजे. दुसरा अंदाज म्हणजे प्रत्येक लघवी फीकी पिवळट रंगाची असावी. पाण्याचे सेवन सकाळ, दुपार आणि संध्याकाळी समप्रमाणात करावे. तीन लिटर पैकी दोन लिटर सकाळीच संपवून अर्थ नाही.
पाण्याचे दोन प्रकार असतात, हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर, हार्ड वॉटर म्हणजे ज्या पाण्यामध्ये क्षारचे प्रमाण जास्त असते जसे बोरवेल किंवा विहिरीचे पाणी. ज्या पाण्यामुळे भांड्यांवर किंवा बादली वर पांढरा थर जमतो ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही. सॉफ्ट वॉटर म्हणजे कमी क्षार असलेले पाणी जसे पावसाचे आणि नदीचे पाणी. सध्या आर. ओ (रिव्हर्स ऑस्मॉसिस) फिल्टर्स बसवण्याची पद्धत घरोघरी दिसून येते. पण सगळ्यांनाच त्याची गरज आहे का? ज्यांच्याकडे म्युनिसिपालिटीच पाणी येतं म्हणजेच नदी किंवा तलावाचं त्यांना आर.ओ ची मुळीच गरज नाही, त्यांनी फक्त यूव्ही (अल्ट्रावायलेट) फिल्टर लावावेत. आर. ओ पाण्यामधील क्षार कमी करतं आणि युवी पाण्यामधल्या जंतूंचा नाश जसे बॅक्टेरिया, व्हायरस ज्यांना बोरवेल किंवा विहिरी शिवाय पर्याय नाही त्यांनी आर. ओ ची मशीन वापरावी. आर. ओ मध्ये देखील टीडीएस हे महत्त्वाचे मोजमाप आहे. टीडीएस म्हणजे टोटल डीजोल्ड सॉलिड. आपल्या आर. ओ चे टीडीएस नियमित रित्या तपासत रहावे. योग्य टीडीएस हे १७५- २०० च्या दरम्यान असते. कमी टीडीएस असल्यास पाण्यामधील महत्त्वाचे घटक जसे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता होऊ शकते.
हा एक गैरसमज आहे की मुतखड्या पासून बचाव करण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं टाळावं. बरेच लोक दूध पिणे सुद्धा बंद करतात. पण खडा न होण्यासाठी शरीराला रोज काही प्रमाणात कॅल्शियमची आवश्यकता असते. किमान रोज एक ग्रॅम कॅल्शियम आहारात घ्यावे. दुध हा कॅल्शियमयुक्त आहार आहे. एक ग्लास दुधात जवळपास ४०० मिलिग्रॅम कॅल्शिअम असते. कॅल्शियमची गरज आहारातूनच भागवावी, कॅल्शियमच्या गोळ्या टाळाव्यात. स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यावर कॅल्शिअमची कमतरता जाणवते आणि डॉक्टर त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करतात अशा वेळी त्यांनी ती गोळी जेवणासोबत घ्यावी. असे केल्याने मुतखडा बनण्याचे प्रमाण कमी होते. तसेच विटामिन डी च्या गोळ्या देखील टाळाव्यात त्याने खडा होण्याचा धोका वाढतो. नैसर्गिक पद्धतीने शरीरात तयार होणारं विटामिन डी लाभदायी असतं म्हणून सकाळी ८ ते १० वाजताच्या दरम्यान उन्हात २० मिनिटं बसावे. हल्ली कोरोनापासून बचावा करिता बरेच लोक विटामिन सी च्या गोळ्यांचे सेवन करत आहेत, त्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण अतिप्रमाणात विटामिन सी घेतल्यावर देखील मुतखडा होण्याचे प्रमाण वाढते म्हणून दिवसाला दोन पेक्षा जास्त गोळ्या घेणे टाळावे.
ओक्झलेट भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे जसे टमाटर, पालक, चवळी, काजू, मैदा, चॉकलेट. मांसाहार कमी करावा त्यामध्ये यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. मिठाचे सेवन कमी करावे साधारण पाच ग्रॅम दिवसाला म्हणजेच जेवणात दिवसाला एका व्यक्तीस फक्त अर्धा चमचा एवढेच मीठ वापरावे. टेबल सॉल्ट हा प्रकार कटाक्षाने टाळावा अर्थात जेवण करताना वरुन मीठ घेणे टाळावे.
कोणत्या पदार्थांचं सेवन वाढवावं?
गाजर, कारलं, सफरचंद, केळी, ओट्स, नारळाचे पाणी. हे खाद्यपदार्थ शरीराला मुतखड्या पासून वाचवण्यास उपयोगी ठरतात. या व्यतिरिक्त ताजं कापलेल लिंबू कोमट पाण्यात दिवसातून दोन वेळा घेणे. रोज पाण्यात भिजवलेले बदाम खावे. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवावे.
लठ्ठपणा हा बऱ्याच आजारांना निमंत्रण देतो. लठ्ठ लोकांमध्ये मुतखड्याचे प्रमाण देखील अधिक पाहायला मिळते म्हणून नियमित व्यायाम, वजन कमी करणे, योग्य आहार हे गरजेचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी शुगर आटोक्यात आणण्याकडे लक्ष द्यावे.
मुतखडा झाल्यावर पुढील दहा वर्षात तो पुन्हा होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. शस्त्रक्रिया झाल्यावर तो खडा तपासणीस दिला जाऊ शकतो, त्याने तो कोणत्या द्रव्याने बनला आहे हे कळून येतं. मेटाबोलिक वरकप नावाची तपासणी उपलब्ध आहे, ज्याचा वापर रुग्णांना पुन्हा मुतखडा होऊ नये, याकरता होऊ शकतो. यामध्ये 24 तासाची लघवी गोळा करून त्यात कुठले क्षार अधिक प्रमाणात आहे हे तपासले जाते आणि नंतर ते क्षार कमी करण्यासाठी औषधे सुरू केली जातात.
आशा करतो ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याबाबींचा समावेश करून घ्या आणि मुतखड्या पासून दूर रहा.
Disclaimer: The information provided here should not be used during any medical emergency or for the diagnosis or treatment of any medical condition. The information is provided solely for educational purpose and should not be considered a substitute for medical advice.